🌸 राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विचारांचा जागर : माध्यमिक विद्यालय आर्दाळ येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव 🌸
"गुणवत्तेचा सन्मान आणि विचारांची प्रेरणा हीच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खरी दिशा आहे."
आर्दाळ : माध्यमिक विद्यालय आर्दाळ येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व वृक्षाला पाणी घालून करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, मान्यवर, पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी "हीच आमुची प्रार्थना" हे प्रार्थना गीत सादर करून उपस्थितांचे स्वागत केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना शाळेचे मुख्याध्यापक शरद पाटील सर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. शाळेची शैक्षणिक वाटचाल, विविध उपक्रम व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे विचार विद्यार्थ्यांनी जीवनात आत्मसात करावेत, असे आवाहन केले.
यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मा. सौ. सुरेखा मोटे (माजी शिक्षण विस्ताराधिकारी, पंचायत समिती भुदरगड), शाळेत नव्याने रुजू झालेल्या सौ. सोनाली पाटील, तसेच विद्यार्थ्यांना वह्या भेट दिल्याबद्दल पांडुरंग काटवळ व तानाजी डोंगरे यांचा शाळेच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
शाळेचे मुख्याध्यापक शरद पाटील सर यांच्या कन्या डॉ. सायली पाटील यांनी दंतचिकित्सा शिक्षण पूर्ण करून डेंटिस्ट म्हणून कार्यरत झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर त्यांचा वाढदिवस असल्याने शुभेच्छा देण्यात आल्या. इयत्ता आठवीतील विद्यार्थी कु. अमेय अमोल बांबरे याचाही वाढदिवसानिमित्त सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
🏆 गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा 🏆
यानंतर गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा पार पडला. इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सन्मानचिन्ह, रोख पारितोषिक व पुष्प देऊन गौरव करण्यात आला.
🥇 प्रथम क्रमांक - कु. हर्षदा निलेश नरवडकर — 90.40%
🥈 द्वितीय क्रमांक - कु. रणवीर राजेंद्र देसाई — 88.40%
🥉 तृतीय क्रमांक - कु. शिवम सुरेश केसरकर — 84.60%
कु. क्रांती रविंद्र चौगले — 84.60%
🏅 चतुर्थ क्रमांक - कु. श्रेयश सुभाष निंबाळकर — 81.00%
🏅 पाचवा क्रमांक - कु. रसिका बाळू सुतार — 79.60%
तसेच NMMS परीक्षेत पात्र ठरलेल्या कु. धनश्री संजय भाटले, किरण प्रवीण साळुंखे व मैथिली सुनील डवरी यांचाही सत्कार करण्यात आला.
राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त आयोजित भाषण स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये कु. आर्या अजित येसादे हिने प्रथम क्रमांक, कु. धनश्री संजय भाटले हिने द्वितीय क्रमांक तर कु. अमेय अमोल बांबरे याने तृतीय क्रमांक मिळवला. अमेयने इंग्रजीतून तर धनश्रीने हिंदीतून प्रभावी भाषण सादर केले.
कै. जनाबाई बंडू काटवळ यांच्या स्मरणार्थ पांडुरंग काटवळ व तानाजी डोंगरे यांच्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन वह्यांचे वाटप करण्यात आले. या वह्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांची माहिती देण्यात आली असून विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर इतिहासाची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
विद्यार्थी मनोगतातून आर्या अजित येसादे, धनश्री संजय भाटले व अमेय अमोल बांबरे यांनी राजर्षी शाहू महाराजांचे विचार प्रभावीपणे मांडले. गुणवंत विद्यार्थ्यांमधून हर्षदा निलेश नरवडकर हिने आपल्या यशामागील अभ्यासाचे नियोजन व अनुभव सांगितला.
शिक्षक मनोगतातून रणजीत पांडुरंग सुतार यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सौ. गंगुबाई पन्हाळकर यांनी शाहू महाराजांचे विचार, शिक्षण व समतेचा संदेश विद्यार्थ्यांना दिला.
प्रमुख पाहुण्या सौ. सुरेखा मोटे मॅडम यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग सांगून शिक्षण, समाजसुधारणा व समानतेसाठी त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेतला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. शिवाजीराव पन्हाळकर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच शाहू महाराजांचे विचार व आदर्श जीवनात अंगीकारण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शिवाजीराव पन्हाळकर सर, प्रमुख पाहुणे म्हणून सौ. सुरेखा मोटे मॅडम, तसेच सौ. गंगुबाई पन्हाळकर, शाळेचे मुख्याध्यापक शरद पाटील, लक्ष्मण लोहार, अमोल बांबरे, सचिन पावले, किरण पवार यांच्यासह शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण सुभाष चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन रणजीत पांडुरंग सुतार यांनी केले.
📸 राजर्षी शाहू महाराज जयंती कार्यक्रमाची छायाचित्र गॅलरी 📸
माध्यमिक विद्यालय आर्दाळ येथे संपन्न झालेल्या राजर्षी शाहू महाराज जयंती व गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्याच्या काही आठवणी...
🌺 माध्यमिक विद्यालय आर्दाळ 🌺
"राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायाचा जो विचार दिला, तो प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनासाठी प्रेरणादायी आहे. ज्ञानाच्या मार्गावर चालत प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या यशाची नवी शिखरे गाठावीत, हीच या जयंतीची खरी प्रेरणा आहे."
छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा जागर करत माध्यमिक विद्यालय आर्दाळ येथे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा हा प्रेरणादायी कार्यक्रम संपन्न झाला.
No comments:
Post a Comment