ज्ञानाची माऊली दिपाली चव्हाण मॅडम.
प्रत्येक घरात जशी आई असते तशीच आमच्या शाळेत एक माऊली होती. अवघ्या लेकरांची ती साऊली होती...अर्थात आमच्या शाळेला लाभलेली ती मायेची अन ज्ञानाची माऊली म्हणजे आमच्या दीपाली चव्हाण मॅडम....
सुखसमृद्ध,ऐश्वर्यसंपन्न घरात जन्मलेल्या चव्हाण मॅडमांच संपूर्ण लहानपण, शिक्षण कोल्हापूर शहरा नजिक असणाऱ्या कळंबा गावात गेलं. माहेरातील आडनावाच्या 'भोगम' नावाने प्रसिद्ध असणाऱ्या माध्यमिक विद्यालय कळंबा पाचगाव शाळेतून दहावी पर्यंत शिक्षण घेऊन बाहेर पडल्या आणि त्याच शाळेत २०११ साली शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. तब्बल दहा वर्षे १ रुपया पगार न घेता विनाअनुदानितवर काम केल्यानंतर २०२१ साली त्यांची माध्यमिक विद्यालय आरदाळ या अनुदानित शाळेत त्यांची बदली झाली. आणि या शाळेशी एकरूप होऊन चव्हाण मॅडमांनी अतिशय प्रामाणिकपणे ज्ञानदानाचे व्रत चालू ठेवले...
चव्हाण मॅडम म्हणजे आमच्या शाळेची प्रतिरूप आईच होती ती. . चेहऱ्यावर सदा निर्मळ हास्य. अत्यंत हळवा आणि मायाळू, निरागस निर्मळ स्वभाव. अशा गोड स्वभावाने मॅडमांनी अगदी कमी वेळेत सर्वांना आपलंसं करून टाकलं. तिकडे ऐश्वर्य संपन्न सुख पायाशी लोळण घेत असताना देखील या शाळेसाठी अवघ्या एका वर्षाच्या तान्ह्या लेकराला घेऊन मॅडम कुटुंबासह उतूर येथे येऊन राहिल्या. शहरामध्ये राहिलेल्या असताना देखील गावाकडच्या माणसांशी मिळून मिसळून घेत इथल्या रांगड्या मातीशी आणि माणसांशीत्यांनी घट्ट नाळ जोडली.
मॅडम प्रसन्न चेहऱ्याने शाळेत यायच्या. वेळेत हजर राहायच्या. मॅडमांचा मराठी विषय असल्याने एखादा पाठ ,कविता अगदी तन्मयतेने मन लावून शिकवायच्या .पहिल्या तासापासून शेवटच्या तासांपर्यंत तोच उत्साह...जशा हसऱ्या मनाने शाळेत येत असायच्या तशाच हसऱ्या मनाने घरी जायच्या...मॅडम म्हणजे आमच्या शाळेचं चैतन्यरुपी मांगल्यचं जणू. देव्हाऱ्यात तेवणारी पणती जशी सगळं वातावरण उजळून टाकते, प्रसन्न करते तशी आमच्या शाळेतली एक तेवणारी ज्ञानाची समई म्हणजे आमच्या चव्हाण मॅडम..त्यांच्यामुळे शाळेचं वातावरण प्रसन्न होई. त्यांच्या अस्तित्वांन शाळा उजळून जाई... जस आईमुळे घराला घरपण येतं तसं चव्हाण मॅडम म्हणजे आमच्या शाळेला लाभलेल आईपणाचं वरदान होतं.
ज्ञानाची सरस्वती जणू या शाळेत नांदत होती. आपल्या वाणीने ज्ञानाचे अमृत पाजणारी आमच्या शाळेची ती सरस्वती वर्गावर्गात वावरत होती. निखळ खळखळत्या झऱ्या सारखं मॅडमांच ते हंसण. प्रत्येकांच्या सुख दुःखात सामील होणं. बरं वाईट विचारणं, कुणाच्या दुःखावर हळुवार फुंकर घालणाऱ्या. कुणाचंही दुःख असू देत मॅडमांच्या डोळ्यांत टचकन पाणी उभा राहायचं.एकदा असेच एका विद्यार्थीनीच्या घरी तिचा सखा भाऊ देवाघरी गेल्यानंतर आम्हीं सांत्वन करण्यासाठी गेलो होतो. तेंव्हा त्या विद्यार्थीनीने आईच्या गळयात पडून रडावं तसं मॅडमांच्या गळ्यात पडून हंबरडा फोडला होता. डोंगराएवढ्या दुःखाला कवेत घेणारी मायलेकींची ती गळाभेट आमच्या ही डोळ्यांच्या कडा पाणावून गेली.. एका शिक्षिकेच्या पुढे जाऊन त्यांनी आईचं नातं विद्यार्थ्यांशी जोडलं. प्रत्येक रक्षाबंधनाला आमच्या हातावर राखी बांधणारी, सर काय झालं हो आज नाराज आहात..म्हणून आपुलकीने विचारणारी ती आमच्या हक्काची बहीण होती.
शाळेच्या गुणवत्तेमध्ये मॅडमांनी तर भर घातलीच. दहावी बोर्ड परीक्षेत मराठी, इतिहास विषयात विद्यार्थी अव्वल गुण घेऊन उत्तीर्ण झाले. कोणतेही उपक्रम, कार्यक्रम असोत नियोजन करायला मॅडम पुढे. सहल असो किंवा वनभोजन असो अगदी घरच्यासारखं सर्वांच्या जेवणाची जबाबदारी मॅडम घ्यायच्या..दर वेळी मुलांचा सर्व्हे करताना त्या आमच्यासोबत असायच्या. त्यावेळी लोहार सर आवर्जून पालकांना सांगायचे की,आईसारखी विद्यार्थ्यांची काळजी घेणाऱ्या चव्हाण मॅडम आमच्या शाळेत आहेत. विशेष म्हणजे हालेवाडी,मासेवाडी या गावी रात्रीच्यावेळी सर्व्हे करायला लागायचा तेंव्हा मॅडम सुद्धा आमच्या सोबत आल्या. पण त्यांनी कधीही कोणतं कारण सांगून येण्याचं टाळलं नाही. मॅडमांच्या सहज,आपुलकीच्या बोलण्याने विद्यार्थी आमच्याकडे शाळेला यायला तयार व्हायचे। मॅडमांनी आपल्या परीने जेवढं योगदान देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न केला.
मॅडमांच्या सोबत मला दोन्हीं ही शाळेत काम करण्याची संधी मिळाली. तेंव्हा त्यांचा मला खूप मोठा आधार होता. माझ्या वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष चालू असताना मॅडम त्या संघर्षाच्या प्रत्यक्ष साक्षीदार होत्या. जेंव्हा आम्हांला काहीच पगार नव्हता तेंव्हा मॅडम अगदी मला बहिणाप्रमाणे समजून सांगायच्या "सर हे ही दिवस जातील.. तूम्ही काळजी करू नका..." आणि झालं ही तसेच. त्यांच्या तोंडातून प्रत्यक्ष परमेश्वर मला हा संदेश देत होता जणू . कारण पुढील काळात दोघनाही पगार सुरू झाला आणि चांगले दिवस सुरू झाले...
मॅडमांच्याकडे परिस्थितीला धरून चालण्याची कला आहे. प्रचंड नम्रता, विनयशीलता, संवेदनशीलता आणि इतराप्रति आदर आहे. मुळात गर्भ श्रीमंती असताना नोकरीची कोणतीही आवश्यकता नसताना देखील शिक्षिका होण्याचं ध्येय ठेऊन त्यांनी आपलं करिअर घडवल. आणि आपल्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं व्रत त्यांनी हाती घेतलं. त्यांचं कुटूंब म्हणजे एक संस्कारशील आणि मनाने श्रीमंत असणारं कुटूंब आहे ज्याची आभाळ एवढी उंची असूनही मातीशी नाळ कायम जोडलेली आहे. आणि म्हणून आपल्या घरातील समृध्दता इतर घरातही नांदली पाहिजे, गोर गरिब सामान्य घरची मुलं शिकून मोठी झाली पाहिजेत याच उदात्त विचारांतून.आणि तळमळीतून त्यानी घेतलेला ज्ञानदानाचा वसा चव्हाण मॅडम मनापासून जपत आहेत.
आज आमच्या या शाळेच्या ज्ञानमंदिरातून आमची रुक्मिणी परत तिच्या मूळ मंदिराकड जात आहे. परंतु त्या रुक्मिणीवर भक्ती करणारी आमची भोळीभाबडी मुलं आशा करून बसली आहेत की आमच्या मॅडम आम्हाला शिकवायला आज येतील उद्या येतील. .अहो ती चिमणी पाखरं कावरी बावरी होऊन सारखी विचारत असतात हो मॅडम कुठे आल्या नाहीत शाळेला.. कधी येणार..? येणार की नाही..तेंव्हा.खरंच काय ऊत्तर सांगायचं कळत नाही. त्या निरागस चिमुकल्यांना... तुम्हीं बदली होऊन गेल्यापासून अगदी सुनी सुनी वाटतेय शाळा...या लेकरांच्या भरल्या गोकुळातून मायच निघून जावी दूरदेशी आणि लेकरं एकटी पडावीत तशी गत झाली आहे..आता हसऱ्या मनानं रोज तुम्ही येणार नाही या शाळेत.
आज तुम्ही चाललात त्या शाळेकडे पण "जशी घार हिंडते आकाशी तिचे चित्त पिलापाशी" तुम्ही जरी त्या शाळेत गेला असला तरी तुमचे चित्त या शाळेत असणार आहे हे ठाऊक आहे आम्हाला..कारण आई कधी विसरते का आपल्या लेकरांना...तसेच तुम्ही कधी विसणार नाही या शाळेला तुमच्या विद्यार्थ्यांना हा विश्वास आहे आम्हांला. जरी आज तुम्ही या शाळेतून बदली होऊन त्या शाळेत गेला असला तरी आपले ऋणानुबंध कायम राहतील. तुमचे येणे होत राहील...आपली भेट होत राहील. अशीच आशा ठेवून मॅडम आपल्या पुढील वाटचाली आम्ही शुभेच्छा देतो...तुम्हाला चांगले आरोग्य लाभो..सुख,समृद्धी,शांती तुमच्या ठायी नांदो आणि ज्ञानदानाचा घेतलेला वसा अखंड चालत राहो असंख्य विद्यार्थी आपल्या हातून घडो... हीच परमेश्वर चरणी प्रार्थना..
जय हो मंगल हो....!
- किरण सुभाष चव्हाण

No comments:
Post a Comment